मुंबई - शहरामध्ये पावसाळ्यात झाडे आणि फांद्या पडतात. त्यात काही लोक जखमी होतात. काहींचा मृत्यूही होतो. असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने धोकादायक झाडांची अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या डी विभागातील मलबार हिल, ताडदेव आदी भागांतील धोकादायक झाडांची तपासणी केली जाणार आहे. झाडांचे आरोग्य शास्त्रीयद्ष्ट्या तपासून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
उद्यानतज्ञाची नियुक्ती -
मुंबईला 'तौक्ते' चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात ८०० हुन अधिक झाडे मुळापासून उखडून पडल्यानंतर मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला. शहरातील झाडांची अंतर्बाह्य प्रकृती नेमकी कशी आहे, याची तपासणी करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी उद्यानतज्ञाचा अभ्यास व अनुभव उपयोगी पडणार असल्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. झाडांचे आरोग्य अचूक समजावे म्हणून तंत्रज्ञानाची जोड देत अत्याधुनिक पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने उद्यानतज्ञ वैभव राजे यांची नियुक्ती केली आहे.
अशा प्रकारे केली जाणार तपासणी -
डी विभागातील मलबार हिलमधील विपुल वृक्षवल्लींपैकी धोकादायक स्तरावर वाटणाऱ्या १०० ते १५० वृक्षांची अंतर्बाह्य पाहणी राजे यांच्याकडून केली जाणार आहे. त्यासाठी जर्मन तंत्रज्ञान असलेल्या यंत्राचा वापर केला जाणार असून त्यात सुईप्रमााणे धारदार वस्तू झाडामध्ये खुपसली जाते. प्रत्येक झाडामधील चक्राकार पापुद्र्यांची तपासणी करुन झाडांची नेमकी स्थिती समजते. त्याप्रमाणे सुरुवातीला साध्या नजरेने झाडांची पाहणी केल्यास कोणत्या झाडांची नीट शास्त्रीय तपासणी आवश्यक आहे, ते लक्षात घेतले जाते. त्यानुसार, यंत्रांच्या सहाय्याने झाडांची पाहणी करुन पालिकेस अहवाल सादर केला जाणार असल्याचे राजे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचा अहवाल महिन्याभरात येणार असून त्याआधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे डी विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.