मुंबई - कोरोना संसर्गामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे देशभरातील बांधकाम उद्योगाला मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत चढ-उतार येत असतात. व्यापार चक्र कधी तेजीचे असते तर कधी मंदीचे असते. मात्र कधी तरी अशी परिस्थिती येते की अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावरून घसरतो.
अशीच परिस्थिती सध्या भारतात कोरोनामुळे आहे. त्यामुळे कंपन्या बुडतील, बेरोजगारी वाढेल या दुष्टचक्राला रोखण्यासाठी सरकार ज्या उपाययोजना करते, त्यालाच ‘स्टिम्युलस पॅकेज’ म्हणतात. ते अद्याप सरकारने म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री यांनी जाहीर न केल्यामुळे बांधकाम व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. निरंजन हिरानंदानी सांगत आहेत. आता लॉकडाउन काळात दिलेला बांधकाम परवानगीचा निर्णय स्वागतार्ह आहे. असे राष्ट्रीय घरबांधणी विकास समिती अध्यक्ष आणि उद्योजक डॉ.निरंजन हिरानंदानी, यांनी म्हटले आहे.
या देशात सर्वत्र लॉक डाउनची स्थिती असली तरी बंद पडलेली बांधकामे काही अटीवर सुरू करण्याची परवानगी गृह मंत्रालयाने देऊ केली आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. अशा कामाला प्रारंभ करण्यासाठी आवश्यक ती जमवाजमव करणे आणि 20 एप्रिल पासून ती सुरू करण्याच्या या सूचना आहेत. अर्थात असे करण्यासाठी आवश्यक ती परवानगी आणि अटींची पूर्तता आवश्यक आहे. आम्ही या सकारात्मक निर्णयाचे स्वागत करतो. अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने कार्यरत करणे यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. तसेच यामुळे स्थलांतरित कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुकर होईल, त्याच्या रोजीरोटीची समस्या दूर होईल आणि संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्नही सुलभ होतील.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या मानवी आणि आर्थिक समस्यांना आपण सामोरे जात आहोत, त्या परिस्थितीत विविध क्षेत्रातील कामाला हळूहळू प्रारंभ करण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरेल. अनेक बांधकाम क्षेत्रात आज अनेक कामगार उपस्थित आहेत, त्याची निवास आणि भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र त्यांना फार काळ रोखणे कठीण ठरले असते,या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्य वेळी झाला आहे. लॉक डाउनमुळे रोज 26 हजार कोटी रुपयांची हानी होत आहे. अशा स्थितीत लॉक डाउन वाढविताना मानवी जीवन सुरक्षित ठेऊन अर्थव्यवस्थेची चाके गतिमान करण्याचा हा निर्णय निश्चित रास्त पाऊल आहे. पण स्टिम्युलस पॅकेज’ अद्याप केंद्रीय अर्थमंत्री यांनी जाहीर न केल्यामुळे बांधकाम व्यवसायात अजून मोठे नुकसान होत आहे, असे विशेष ईटीव्ही भारतला हिरानंदानी म्हणाले.