मुंबई - दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये आता स्टँड पोस्टद्वारे पाणी मिळणार आहे. कोरोनाच्या संकटात झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी संंबंधित व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक 1 च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पाठपुराव्यानंतर गणपत पाटील नगर झोपडपट्टीत हा प्रयोग सुरू करण्यात आला. येथील गल्ली क्रमांक 12 येथे स्टँड पोस्ट लावण्यात आलाय. तसेच येणाऱयचा काळात गल्ली क्रमांक 5 ते 14 मध्ये लवण्यात येणार आहेत. यापूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. मात्र टँकरद्वारे पाणी भरताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती.
शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी याठिकाणी राहणाऱ्या लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला होता. तर नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पालिका सभागृहात 'मागेल त्याला पाणी' देण्याची आग्रही भूमिका मांडली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. कोरोनाच्या संकटात पाण्याचा वापर जास्त होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत आता विभागातील नागरिकांना पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे.