मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ गोवा किनारपट्टी पासून 250 किलोमीटर लांब आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किनारपट्टी भागात जास्त असणार आहे. कारण या भागातूनही चक्रीवादळ जाणार असून, महाराष्ट्राला कुठे धडकणार नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी सायंकाळी 7 वाजता दिली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम हा संपूर्ण कोकणामधील जिल्ह्यात दिसून येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 18 मे ला हे चक्रीवादळ गुजरातला पोहोचेल. या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याबरोबर ताशी 40 ते 60 किलोमीटर वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. 16 मे आणि 17 मे रोजी मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे. रत्नागिरी आणि सिधुदुर्ग साठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गोवा राज्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती भुत्ते यांनी दिली आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
अतिवृष्टीची शक्यता असलेल्या केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड या पाच जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, केरळच्या सागरी किनाऱ्यावर वादळीवाऱ्यासह 15 मे ते 17 मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंत्रणा सज्ज
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे बंद ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मच्छिमारांना मासेमारीसाठी जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणला आवश्यक यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - कोरोनाला घाबरू नका, परंतु जागरूक रहा; एआयजीची मार्गदर्शिका वाचा!