मुंबई - हरिद्वारचा कुंभमेळा व पश्चिम बंगालचा राजकीय मेळा यातून देशाला फक्त कोरोनाच मिळाला. राज्यकर्त्यांनी आधी स्वतःवर निर्बंध घालून घ्यायचे असतात. असे म्हणत शिवसेनेने पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा पोर्तुगालचा दौरा रद्द केला हे ठीक झाले, पण त्यांनी पश्चिम बंगालातील गर्दीच्या निवडणूक सभा वेळीच आवरल्या असत्या तर कोरोनाचा संसर्ग थांबवता आला असता, असा टोलाही शिवसेनेने दैनिक 'सामना'तून लगावला आहे.
राज्यकर्त्यांनी आधी स्वतःवर निर्बंध घालून घ्यायये असता
शिवसेनेने 'सामना'मधून पश्चिम बंगाल निवडणुकीतील मेळावे आणि कुंभमेळा यावरुन केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. देशात ऑक्सिजनचा तुडवडा आहे त्यावरही केंद्र थातुरमातुर उत्तरे देत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन टाळा असा सल्ला दिला, मात्र महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे तेव्हा पंतप्रधान लॉक डाऊन टाळा असा सल्ला कोणत्या आधारावर देत आहेत? असा सवालही शिवसेनेने केला आहे.
काय म्हटले अग्रलेखात
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा पोर्तुगालचा नियोजित दौरा रद्द केला हे ठीक झाले, पण त्यांनी पश्चिम बंगालातील गर्दीच्या निवडणूक सभा वेळीच आवरल्या असत्या तर कोरोनाचा संसर्ग थांबवता आला असता. पश्चिम बंगालातील प्रचारासाठी भाजपने देशभरातून लाखो लोक गोळा केले. ते कोरोनाचा संसर्ग घेऊन आपापल्या राज्यांत परतले. त्यातील अनेक जण कोरोनाने बेजार आहेत. हरिद्वारचा कुंभमेळा व पश्चिम बंगालचा राजकीय मेळा यातून देशाला फक्त कोरोनाच मिळाला. राज्यकर्त्यांनी आधी स्वतःवर निर्बंध घालून घ्यायचे असतात. इतर देशांच्या पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांनी असे निर्बंध स्वतःवर घालून घेतले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेला प्रवचन द्यायचा नैतिक अधिकार प्राप्त झाला आहे. नॉर्वेच्या पंतप्रधानांनी त्यांच्या वाढदिवशी १० लोकांना परवानगी असताना १३ लोक बोलावले तेव्हा तेथील पोलिसांनी आपल्याच पंतप्रधानांस जबर दंडाची शिक्षा ठोठावली. हे आपल्या देशात फक्त सामान्यांच्या बाबतीत होऊ शकते. इतरांच्या बाबतीत काय व कसे ते पश्चिम बंगालात दिसून आले आहे.