मुंबई - डॉ. पायलने आत्महत्या केली नाही, तर तिचा खून करण्यात आल्याचा आरोप वकील नितीन सातपुते यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला होता. पोलिसांचा तपास असमाधानकारक असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पायल तडवीने तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. डॉ. पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. तिघींविरोधात अॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जातीवरून पायल यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली होती.
या प्रकरणातील तपास हा असमाधानधारक आहे. काल त्या प्रकारचा युक्तीवाद मी न्यायालयात केला होता. काल या प्रकारणाबाबतचा संदेश मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला होता. आज या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जर गुन्हे शाखेकडूनही तपास नीट झाला नाही, तर सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहितीही सातपुते यांनी दिली.