मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांना फरार घोषित करण्यासंदर्भातला निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचं की नाही, यावर सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. मुंबई गुन्हे शाखेतर्फे(Mumbai Crime Branch) सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. तर, सिंग सध्या गायब असून न्यायालयातही ते हजर राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स देखील बजावण्यात आला होता. मात्र, काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
- न्यायालयाने निर्णय ठेवला राखून -
मुंबई गुन्हे शाखेच्यावतीने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाने युक्तीवाद करताना वारंवार चौकशीचे समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले. परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले. मात्र, ते त्यांच्या कोणत्याही पत्त्यावर उपलब्ध नाहीत. तसेच कोणत्याही चौकशीसाठी पोलिसांच्या संपर्कात नाहीत.
- परमबीर सिंग यांना फरार घोषित करा - गुन्हे शाखा
परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याची परवानगी मिळावी आणि खटल्यातील पुढील चौकशीची सुरुवात करावी, अशी मागणी मांडण्यात आली. असं झाल्यास परमबीर सिंग यांच्या अन्य मालमत्तांवर जप्तीची कारवाई होऊ शकते. यासंदर्भातील युक्तीवाद न्यायालयात झाल्यानंतर न्यायाधीशांनी निर्णय़ राखून ठेवला आहे.