मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात 23 मे रोजी सुनावणी होणार आहे. ऋषिकेश देशमुख यांना अटकेपासून दिलासा मिळतो, की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने बजावली होती नोटीस - 100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली होती. मात्र ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात न जाता त्यांनी मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे. ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात ऋषिकेश देशमुख यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र काही कारणास्तव ते हजर राहू शकत नाहीत. याबाबतचा अर्ज ऋषिकेश देशमुख यांचे वकील इन्द्रपाल सिंह यांनी केला होता. कोर्टाने देशमुख यांचा अर्ज मंजूर केला आहे.
काय आहे 100 कोटी घोटाळा प्रकरण ? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.