मुंबई - मुंबईमध्ये अनेक ठिकणी स्काय वॉक उभारले आहेत. या स्काय वॉकचा नागरिकांकडून वापर कमी केला जात असल्याने ते पांढरा हत्ती झाले आहेत. यामुळे याचा वापर किती लोक करतात, त्यांची स्थिती काय याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे.
दुरुस्तीचा खर्च वाढला -
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये पश्चिम उपनगरतील गोरेगाव पश्चिम, कांदिवली पूर्व, बोरीवली पश्चिम आणि दहिसर परीसरातील सर्व स्काय वॉकच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या स्कायवॉकच्या दुरुस्ती खर्चात वाढ झाली असून सुधारित अंदाजपत्रकानुसार या स्कायवॉकच्या दुरुस्तीचा खर्च 16 कोटी 62 लाखावरुन 19 कोटी 63 लाखांवर पोहोचला आहे. दरम्यान हा प्रस्ताव स्थायी समितीत मांडल्यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांकडून याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एमएमआरडीएने करोडो रूपये खर्च करून स्कायवॉक बांधले. त्यानंतर ते पालिकेकडे हस्तांतरित केले. त्यांचा वापर होत नसताना दुरुस्तीसाठी खर्च करावा लागत आहे. स्कायवॉक म्हणजे पांढरा हत्ती ठरले आहेत. स्कायवॉकचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यामुळे स्कायवॉकवर किती खर्च केला आणि त्याचा वापर किती होतो याचा अहवाल सादर करण्याची मागणी रवी राजा यांनी केली आहे.
काय होते अंदाजपत्रक -
स्थाई समितीने समितीने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार स्कायवॉकच्या दुरुस्तीचा खर्च 18 कोटी 31 लाख रुपये होता. मात्र कंत्राटदाराने 13 कोटी नऊ लाख रुपयात हे काम करण्याची तयारी दर्शवली असून सर्व करांसह हे कंत्राट 16 कोटी 61 लाख रुपयांना देण्यात आले. मात्र कंत्राट दिल्यानंतरही पालिकेने पुन्हा सल्लागाराची नियुक्ती केली. नवी नियुक्ती केलेल्या कंत्राटदराने स्कायवॉकच्या कामाबाबत काही सूचना केल्या त्यामुळे पालिकेच्या अंदाजित खर्चात 18 कोटी 31 लाख रुपयां वरुन 22 कोटी 21 लाख रुपये इतका वाढ झाली आहे. कंत्राटदाराने 28.30 टक्के उणे दराने करायची तयारी दर्शवली असून 13 कोटी 9 लाखाच्या कंत्राटात 2 कोटी 49 लाखांची वाढ करण्यात आली आहे तसेच 16 कोटी 11 लाख रुपयात या स्कायवॉकची दुरुस्ती होणार आहे. तर,सर्व करांसोबत हा खर्च 19 कोटी 63 लाखांवर पोहचला आहे.