मुंबई - चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. या व्हायरसने ८० हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. मुंबईतही या व्हायरसचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे सर्व अभ्यास दौरे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा - अंडरवर्ल्डमधील मांडवली बादशहा सलीम महाराजला अटक
मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक, विशेष समित्यांचे दरवर्षी कार्यकाळ संपायला आल्यावर अभ्यास दौरे काढले जातात. या दौऱ्यामधून नगरसेवकांना काही शिकायला मिळत नसले तरी त्यांची पिकनिक मात्र होते. यामुळे दरवर्षी या अभ्यास दौऱ्यांवर टीका होत असते. यावर्षीही उत्तराखंडमधील देहराडून येथे शिक्षण समितीचा दौरा जाणार होता. देहराडून हे शिक्षणाचे माहेरघर बोलले जाते. त्याकारणाने तेथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण समितीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. सुधार समितीचा दौरा उटी-म्हैसून येथे जाणार होता. स्थापत्य समितीचा दौरा अंदमान येथे जाणार होता. वृक्ष प्राधिकरण समितीचा सिंगापूर येथे तर महिला व बाल विकास समितीचा केरळ येथे दौरा आयोजित केला होता.
आरोग्य समितीच्या माध्यमातून चीनला अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार होता. गटनेत्यांच्या सभेत विशेष समितीचा दौरा भारताबाहेर काढता येत नाही आणि त्यासाठी महापालिकेचा पैसा खर्च करता येत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला होता. परंतु, गटनेत्यांनी आरोग्य समितीच्या माध्यमातून काढण्यात येणार्या चीनच्या अभ्यास दौर्याला मंजुरी नाकारल्यानंतरही आरोग्य समिती सदस्यांसह इतर नगरसेवक व महापौर किशोरी पेडणेकर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत हे चीनला स्वखर्चाने जाणार होते.
मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यात असे दौरे काढून करदात्या नागरिकांच्या करोडो रुपयांचा चुराडा होत असल्याने काही समिती सदस्यांनी आधीच विरोध केला होता. त्यातच आता चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. हा व्हायरस आता भारतात आणि मुंबईतही पसरला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यानी काळजीपोटी सर्व अभ्यास दौरे रद्द करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्व दौरे रद्द करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.