मुंबई - महापालिका क्षेत्रातील मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या विभागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी मिशन झिरो सुरू करण्यात आले आहे. या विभागात ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांनाच उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे या विभागातील रुग्णालयांची तपासणी करुन उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयातील कोव्हीड बेड द्या, असे स्पष्ट आदेश आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज मालाड पूर्व विभागातील प्रतिबंधित क्षेत्राचा पायी पाहणी दौरा केला. या दौऱयादरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यासह त्यांनी या भागात महापालिकेतर्फे पुरविण्यात येत असलेल्या नागरी सेवा-सुविधांची पाहणी केली. याच अनुषंगाने रुग्णालयातील खाटांचे व्यवस्थापन अधिकाधिक परिणामकारकपणे व्हावे, तसेच गरजूंना लवकरात-लवकर ‘कोविड बेड’ मिळावा, यासाठी ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत, अशाच रुग्णांना रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत ‘बेड’ मिळावा, यासाठी सर्व परिमंडळीय सहआयुक्त, उपायुक्त आणि विभागातील सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांची पुढील ४८ तासात तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
या तपासणी दरम्यान गरज नसलेल्या एखाद्या रुग्णाला बेड दिला असल्याचे निदर्शनास आल्यास, सदर अॅडमिशन रद्द करावी, जेणेकरुन लक्षणे असलेल्या व्यक्तिंना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकतील असे आयुक्त म्हणाले. 'पी-उत्तर' विभागात कोरोना बाधित ३ हजार २६७ रुग्ण आतापर्यंत आढळले असून त्यापैकी १ हजार ४४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मालाड भागात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आज महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या परिसरांचा पायी पाहणी दौरा केला. या दौऱयादरम्यान महापालिका आयुक्तांनी मालाड पूर्व परिसरातील आप्पापाडा, संत्री कंपाऊंड, प्रथमेश नगर, देवकी नगर, शिवशाही रहिवासी संघ, महेश्वर नगर आदी भागातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या.
आयुक्तांनी स्थानिक दुकानदार, व्यापारी, हॉटेलचालक, विविध व्यावसायिकांशीही संवाद साधला. परिसरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच तेथील परिस्थिती जाणून घेतली. या सार्वजनिक शौचालयांमध्ये नियमितपणे दिवसातून ५ ते ६ वेळा 'सॅनिटायझेशन' करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱयांना दिल्या आहेत.