मुंबई - जगाला आणि देशाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक ठिकाणच्या कार्य संस्कृतीत बदल झाल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य आपापल्या जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणाच्या कामात गुंतल्याने परवा (मंगळवार) राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली होती. आजही राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेणार आहेत.
हेही वाचा... कोरोना चाचण्या मोफत करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा 5.50 लाख व्यक्तींना दररोज जेवण देण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती.
राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असून पुढील महिन्याच्या वेतनाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवांसाठी विशेष तरतूद करणे देखील आवश्यक आहे. केंद्राकडे करावयाच्या पाठपुरावा संदर्भातच राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक अत्यावश्यक धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.