मुंबई - सध्या सर्वत्र मलेरियासाठी उपचारार्थ वापरले जाणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनावर उपाय म्हणून वापरता येऊ शकते, अशी चर्चा होत आहे. या औषधाचा वापर कोरोनावर होत असल्याचे समजल्यापासून कोणीही उठसुठ मेडिकलवर जाऊन या गोळ्यांची मागणी करत आहेत. तर काही औषध विक्रेते या गोळ्या देतही आहेत. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... ....साठ वर्षात आपला देश विज्ञान आणि औषधनिर्मिती क्षेत्रांत प्रगतीपथावर पोहचल्याचे हे प्रमाणपत्र
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे औषध आधी 'शेड्युल एच' मध्ये येत नव्हते. म्हणजेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे औषध मेडिकलमध्ये मिळत होती. मात्र, आता या औषधांची वाढती मागणी आणि औषधांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, या औषधाचा समावेश 'शेड्युल एच'मध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या विकता येणार नाहीत. मात्र, असे असले तरिही या गोळ्यांची बेकायदा खरेदी-विक्री सुरू आहे. अशावेळी विना डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधाचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच यामुळे अगदी हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही औषधे कोणीही स्वतःहुन घेऊ नये आणि औषध विक्रेत्यांनीही या औषधांची विक्री करू नये, असे आवाहन डॉ. उत्तुरे यांनी केले आहे.