मुंबई : राज्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येने दहा हजारांचा नवा उच्चांक गाठला. तर मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी अकराशेच्या वर नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना नियंत्रणासाठी गौरविलेल्या धारावीमध्येही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आता आर्थिक राजधानी पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे.
मुंबईत 1173 नवे रुग्ण, 3 जणांचा मृत्यु
मुंबईत चांगल्या उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र फेब्रुवारीमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस मुंबईत एक हजारच्या वर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर गेल्या तीन दिवसांत सलग अकराशेच्या वर नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या पाहता मुंबईकरांना अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 3 लाख 31 हजार 16 वर गेली आहे. तर सध्या मुंबईत 10 हजार 469 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 15 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर रुग्ण आढळून आल्याने 188 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
धारावीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणाऱ्या धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले होते. मात्र आता पुन्हा धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. धारावीत ४ मार्चच्या आकडेवारीनुसार ७३ सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर येथे पुन्हा कठोर उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. येथे मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. तर एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या १५ ते २० जणांना क्वारंटाईन केले जात आहे.
एका हॉटेलमधील 10 कर्मचारी कोरोनाग्रस्त
अंधेरीतील राधाकृष्ण हॉटेलमधील 35 पैकी 10 कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले आहे. यानंतर पालिकेकडून हे हॉटेल सील करण्यात आले आहे. मात्र दिलेल्या कालावधीच्या आधीच हॉटेल पुन्हा सुरू केल्याने आता पालिका काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक, शुक्रवारी 10,216 नव्या रुग्णांची नोंद