मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमुळे सर्व घटकातील नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. सध्या राज्यासह देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. सध्या, राज्यात सण उत्सवाचे दिवस आहेत. अशात गोडधोड असल्याशिवाय उत्सव साजरा केल्यासारखे वाटत नाही. परंतू, अनलॉकनंतरही मिठाई व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प असल्याचे पाहायला मिळत आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद होते. त्यामुळे नाशवंत पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. या व्यावसायिकांमध्ये मिठाई विक्रेत्यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
हेही वाचा - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उद्योगाला कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घरघर
काही मिठाई वाटली तर काही फेकून दिली...
ज्यावेळी लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा दुकानांमध्ये तयार असलेली मिठाई दुकानदारांनी नागरिकांना अशीच वाटून दिली तर खराब झालेली मिठाई नाईलाजाने फेकून द्यावी लागली. पुणे शहरात 1940मध्ये 'दिल्लीवाला डेअरी अँड स्वीट्स' च्या मालकाने छोट्या स्वरूपात आपला व्यवसाय सुरू केला होता. आता त्यांच्या पुणे शहरात आठ ठिकाणी शाखा आहेत.
दिल्लीवाला यांची मिठाई आणि लस्सी प्रसिद्ध आहे. 23 मार्चनंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या आठही शाखांमधील मिठाई, मावा, लस्सी, दही, चक्का, श्रीखंड फेकून द्यावे लागले. त्यांना अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. आता अनलॉकमध्ये जेव्हापासून दुकाने सुरू करण्यात आली आहेत तेव्हापासून श्रीखंड, तूप, दही यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
अगोदर, दररोज 250 ते 300 किलो दही विक्री होत असे. सध्या फक्त 40 ते 50 किलोपर्यंतच दही विकले जाते, अशी माहिती मोहसीन मोहम्मद दिल्लीवाला यांनी दिली. दिल्लीवाला यांच्या प्रमाणेच शेकडो शहरांमध्ये लाखो मिठाई व्यावसायिकांना लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता अनलॉकमध्ये दुकाने सुरू करण्यास परवानगी तर मिळाली आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे ग्राहक मिळत नसल्याने मिठाई व्यावयायिक संकटात आले आहेत.
हेही वाचा - ...म्हणून काही मिठाई वाटली तर काही फेकून दिली
लॉकडाऊन काळात कामगार गावी गेलेले परत न आल्याने व्यावसायिकांपुढे समस्या..
पुण्यातील प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक काका हलवाई यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. पुण्यात विविध ठिकाणी काका हलवाई यांचे दुकान आहे. काका हलवाई यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मिठाई तयार केली जाते. पण, २३ मार्चनंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तयार करून ठेवलेली मिठाई आणि कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही कच्चा माल फेकून देण्यात आला तर, काही तयार केलेली मिठाई दत्त मंदिर येथे बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी भोजन योजनेसाठी देण्यात आली.
काही कामगार लॉकडाऊनमध्ये घरी गेल्यानंतर अद्याप परत आलेले नाहीत, तर जे होते त्यांची दुकानातच राहण्याची व्यवस्था केली, अशी माहिती काका हलवाईचे पार्टनर युवराज गाढवे यांनी दिली. अनलॉकमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत पाच-पाच ग्राहक आत सोडले जात आहेत. आत येणाऱ्या ग्राहकांचे सुरुवातीलाच स्क्रीनिंग केले जात आहे.
दुकानांमधील कामगारांनाही मास्क, हॅन्डग्लोस तसेच कॅपचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे, असेही गाढवे यांनी सांगितले. पुणे शहरात लहान मोठे असे मोठ्या प्रमाणत मिठाई व्यावसायिक आहेत. लॉकडाऊनचा फटका जसा या मोठ्या व्यावसायिकांना बसला, तसाच फटका शहरातील छोट्या व्यावसायिकांनाही बसला आहे.
हेही वाचा - स्पेशल : अनलॉकनंतरही मिठाईतला गोडवा परतेना, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर त्याचा सर्वच स्तरावर परिणाम झाला. प्रामुख्याने, अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांना याचा पहिला तडाखा बसला. यात व्यावसायिकांचे जसे नुकसान झाले, तसेच अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या. 12 महिने चालू राहणारी मिठाईची दुकाने देखील काही काळ बंद पडली आणि आता अनलॉकच्या काळातही या व्यावसायाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.