मुंबई - कोरोना संक्रमण राज्यातील कारागृहात पसरू नये म्हणून राज्य शासनाकडून राज्यातील तब्बल 28 हजार 539 कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर राज्यातील 47 कारागृहात कोरोना संक्रमण पोहोचल्याचे लक्षात आल्यानंतर यावर राज्य कारागृह प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमन नियंत्रणात आल्याचे समोर आले आहे. यावरच 'ई टीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट...
हेही वाचा - VIDEO : महाड इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू, तर अद्याप 17 जण अडकले.. पाहा 'रेस्क्यू ऑपरेशन'
राज्यातील कारागृहांमधील कोरोना संक्रमणाची स्थिती
कोरोना संक्रमण राज्यातील कारागृहात पोहोचल्यानंतर यावर उपाययोजना करण्यात आल्या. 22 ऑगस्टपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 47 कारागृहातील तब्बल 7 हजार 423 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 1 हजार 255 कैदी कोरोना संक्रमित आढळून आले. त्यातील तब्बल 889 कैदी कोरोनातून आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले असून, आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात मिळून 6 कैदी व 1 कारागृह कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे कैद्यांचा मृत्यू झालेली कारागृह
मुंबई - राज्यात सर्वाधिक कोरोना संक्रमित कैदी हे मुंबईतील मध्यवर्ती कारागृह म्हणजेच आर्थर रोड कारागृहात आढळून आले होते. आर्थर रोड कारागृहात 781 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर यात तब्बल 182 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यातील आतापर्यंत सर्व म्हणजेच 182 कैदी हे उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. आर्थर रोड कारागृहात एकाही कैद्याचा मृत्यू झालेला नाही.
पुणे - पुण्यातील येरवडा कारागृहात 713 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात 191 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात उपचारानंतर आतापर्यंत 42 कैदी बरे झाले असून, 2 कैद्यांचा मृत्यू झाला आहे.
धुळे - धुळे जिल्हा कारागृहात एकूण 22 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, यातील 4 कोरोना संक्रमित कैदी आढळून आले आहेत. आतापर्यंत 3 कैदी बरे झाले असून, एका कैद्याचा मृत्यू झाला आहे.
अमरावती - अमरावती मध्यवर्ती कारागृहात 181 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, असता यात 43 कैदी कोरोना संक्रमित आढळून आले. यात 3 कैदी आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले असून, एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई - तळोजा मध्यवर्ती कारागृहात 50 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात तीन कोरोना संक्रमित कैदी आढळून आले आहेत. यातील आतापर्यंत एक कैदी बरा झाला असून, 2 कैदी व 1 कारागृह कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
सुरुवातीला राज्यातील 17 हजार कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन सोडण्यात आले होते. यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या हाय पावर कमिटीच्या 25 मार्च सूचनेनुसार तब्बल 5105 कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले, तर राज्य शासनाच्या 5 मे 2020 च्या आदेशानुसार राज्यातील तब्बल 2489 कैद्यांना आपत्कालीन पॅरोल मंजूर करण्यात आला होता. याबरोबरच 11 मे 2020 च्या हाय पावर कमिटीच्या सूचनेनुसार 2945 कैद्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. सध्याच्या घडीला राज्यातील कारागृहात तब्बल 26 हजार 780 कैदी असून, त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे.
कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी कारागृहात विशेष उपाययोजना
कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी राज्यातील सर्व कारागृहात कैद्यांचा रोजच्या दिनक्रमात बदल करण्यात आले आहेत. कैद्यांच्या रोजच्या आहाराची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कैद्यांकडून दररोज योगा, व्यायाम करून घेतला जात असून, सकाळी सात ते आठ या दरम्यान सूर्यप्रकाशात कैद्यांना सन बाथ दिला जातो. कैद्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात अधिकाधिक उकडलेल्या पदार्थांचा समावेश केला असून, कैद्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे दिली जात आहेत. तसेच रात्री कैद्यांना हळदीचे दूध दिले जात असल्याचे कारागृह दक्षिण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांनी सांगितले आहे.
राज्यातील एकूण कारागृहात टाडा, बँकांचे मोठे आर्थिक गुन्हेगार, बलात्काराचे आरोपी, मकोका गुन्हेगार यांना सोडण्यात आलेले नाही. राज्यातील 60 कारागृहात कैद्यांना त्यांच्या कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी तब्बल 65 कॉइन बॉक्स टेलिफोनची व्यवस्था करण्यात आली असून, व्हिडिओ कॉल संवाद करण्यासाठी 62 स्मार्टफोनची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.