मुंबई - कोरोना लसींचा तुटवडा असल्याने अनेक मुंबईकर ज्याठिकाणी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, अशा केंद्रात नोंदणी करत आहेत. मात्र, लस घेण्यासाठी केंद्रापर्यंत जाण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध नागरिकांना समस्यांना समोर जावे लागत आहे. याबाबत काही नागरिकांनी समाज माध्यमांवर तक्रारी केल्या होत्या. यामुळे आता मध्य रेल्वेने लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे.
नागरिकांना मिळाला दिलासा -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईकरांची जीवनवाहिनी उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांना नागरिकांसाठी लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून अनेक परिसरात लसीअभावी काही काळ केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांकडून ज्याठिकाणी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, अशा केंद्रात नोंदणी करतात. तसेच काही नागरिक आपल्या सोयीनुसार कामाला जाण्याच्या ठिकाणातील जवळील लसीकरण केंद्रात नाव नोंद करतात. मात्र, सर्व सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद असल्याने लसीकरण केंद्रावर पोहचण्यासाठी अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी याबाबत रेल्वेच्या टिट्वटर खात्यावर तक्रारी केल्या होत्या. तसेच विचारणा करण्यात येत होती. त्यानंतर रेल्वेकडून तक्रारकर्त्यांला लोकल प्रवास करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशी मिळणार तिकीट -
नागरिकांना लोकलचे तिकिट घेण्यासाठी मोबाईलवरील कोरोना लस कुठे घेत आहे, किती वाजता घेतली जाणार आहे, याची माहिती रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर खात्री करून लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रवाशाला रेल्वेकडून तिकीट देण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशाला सुद्धा लोकल प्रवासाची मुभा अगोदरच दिली आहे. अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
मध्य रेल्वेवरच प्रवास -
एकीकडे मध्य रेल्वेने कोविड लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रवासाला लोकल प्रवासाची मुभा दिलेली आहे. मात्र दुसरीकडे याबाबत पश्चिम रेल्वेने यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. पश्चिम रेल्वेचे मुख्यजनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या कॅटेगिरीमधील प्रवाशांना लोकल प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे. यात अन्य कोणत्याही कॅटेगिरी सामील केल्या नाहीत. तसेच अद्याप कोणत्याही प्रवाशाकडून कोरोना लस घेण्यासाठी लोकल प्रवास करण्याची विचारणा पश्चिम रेल्वेकडे केली नाही. त्यामुळे अजून यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.