मुंबई - कोरोना विषाणूविरोधी लसीकरण मोहिमेचा आजपासून देशव्यापी प्रारंभ होत आहे. मुंबईत एकूण ९ लसीकरण केंद्रांवर मिळून ४० लसीकरण बूथ कार्यान्वित होणार आहेत. या सर्व बूथवर मिळून प्रारंभी दररोज सरासरी ४ हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यव्यापी कोविड १९ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये सकाळी होणार आहे. दरम्यान, विलेपार्ले स्थित कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी शुभारंभाचा एक भाग म्हणून लसीकरणाचा प्रारंभ करण्यात येईल.
लस रवाना -
या लसीकरण मोहिमेसाठी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते एफ/दक्षिण विभाग कार्यालयातून काल दुपारी ९ कोविड लसीकरण केंद्रांमध्ये विहित प्रक्रियेनुसार लससाठा रवाना करण्यात आला. आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. मंगला गोमारे यावेळी उपस्थित होत्या.
७ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण -
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. सद्यस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार लशींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण मोहिमेची संपूर्ण तयारी झाली आहे. कांजूरमार्ग येथील प्रादेशिक शीतगृह केंद्राचे काम पूर्णत्वास आले आहे. लसीबाबत नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यात येत आहेत, असेही महापौरांनी नमूद केले. या मोहिमेसाठी ७ हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले असून १० हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे, असे महापौरांनी विशेषत्वाने नमूद केले.
लसीकरणानंतरही मास्क वापरा -
लसीकरण झाल्यामुळे आपली जबाबदारी संपली नसून यानंतरही नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळणे, हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा नियमितपणे वापर करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून यासाठी एका ॲपद्वारे लघुसंदेश संबंधित व्यक्तींना जाणार आहे.
लसिकरणाचे टप्पे -
मान्यताप्राप्त लसींचे लसीकरण हे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ३ टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी उदाहरणार्थ जसे की स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे.
कोविन अॅप -
लसीकरणासाठी केंद्रशासनाने कोविन ऍप हा डिजिटल मंच विकसित केला आहे. त्या माध्यमातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. नजीकच्या काळात तिसऱ्या टप्प्यात नागरिकांनासाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - गाबा कसोटी : ३६९ धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव