मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लडसह युरोप, पूर्व मध्य आशिया, दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी व भारतात आल्यावर क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात आता ब्राझील देशाचीही भर पडली आहे. ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांना भारतात येताना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल बंधनकारक करण्यात आले आहे.
'या' देशातील प्रवाशांनाही चाचणी सक्तीची -
मुंबईत गेले अकरा महिने कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असतानाचा मागील वर्षीच्या शेवटी युकेमध्ये नवा कोरोनाचा स्ट्रेन आढळून आला. या नव्या स्ट्रेनचा प्रसार मुंबईत होऊ नये म्हणून इंग्लडसह युरोप, पूर्व मध्य आशिया, दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असला तरच मुंबईत प्रवेश दिला जात होता. त्यापूर्वी या प्रवाशांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये पाठवून क्वारंटाईन केले जात होते. सात दिवस हॉटेलमध्ये राहिल्यावर चाचणी केल्यावर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या प्रवाशांना घरी पाठवून पुन्हा सात दिवस त्यांना होम क्वारंटाईन केले जात होते. या दरम्यान प्रवाशांना कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात उपचार केले जात होते.
ब्राझीलमधील प्रवाशांनाही चाचणी सक्तीची -
आता ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना चाचणी अहवाल आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. ब्राझील देशातून आलेला प्रवासी कोरोना निगेटिव्ह असला तरी त्याला सात दिवस हाॅटेलमध्ये व नंतर होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे परिपत्रक आज पालिकेने प्रसिद्ध केले आहे. युके येथून आलेल्या प्रवाशांना कोविडची बाधा असल्याने त्यांच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात विशेष कक्षात उपचार केले जातील. तर
मिडल ईस्ट, युरोप, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील येथून येणाऱ्या प्रवाशांना कोविडची बाधा झाली असल्यास त्यांना फोर्ट येथील जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याच बरोबर या रुग्णांना बॉम्बे, रहेजा, हिंदूजा आणि रिलायन्स या चार खासगी रुग्णालयातही उपचार घेता येणार आहे असे पालिकेच्या परिपत्रकात म्हटले आहे.