मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु केल्या जाणार असल्याने मुंबई महापालिकेच्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. गेल्या आठवडाभरात मुंबई महापालिकेच्या ७१३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र मुंबईत आता ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याने शिक्षकांना शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा कोरोना चाचण्या कराव्या लागणार आहेत.
३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद -
राज्यात आणि मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होतील, अशी घोषणा केली होती. मात्र देशभरात वाढणारे रुग्ण, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा सुरू होणार नसल्याचा निर्णय घेतला.
तीन शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह -
पालिका आयुक्तांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करणार नाही, असा निर्णय घेतला असला तरी २३ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांच्या कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली होती. गेल्या आठवडाभरात ७१३ शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७१० शिक्षकांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर ३ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
पालिकेच्या किती शाळा, किती शिक्षक -
मुंबई महापालिकेच्या 1187 शाळा आहेत. त्यात 2 लाख 96 हजार 815 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 10 हजार 894 शिक्षक शिक्षण देण्याचे काम करत आहेत. खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित 2596 शाळा आहेत. त्यात 7 लाख 96 हजार 814 विद्यार्थी शिक्षण घेत असून 23 हजार 449 शिक्षक शिक्षण देण्याचे काम करत आहेत.