मुंबई - मागील काही दिवसात राज्यात कोरोना विषाणूने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. आज (सोमवार) मंत्रालयातील एका कर्मचाऱयामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याची बाब समोर आली आहे. यामुळे मंत्रालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज मंत्रालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्याला तातडीने पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कोरोनाचे लक्षणे आढळून आलेल्या या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा एक भाऊ नुकताच अमेरिकेतून आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आहे.
आज या कर्मचाऱयाला ताप व कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे त्याची मंत्रालयातील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत संशय आल्यामुळे या कर्मचाऱ्याला पुढील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले. कोरोनासदृश्य लक्षणांचा संशय आल्यामुळे फक्त वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र, यासाठी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे येथील डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, आज दुपारीच मंत्रालयात बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने येत्या काही दिवसात मंत्रालयात अडचणीचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा -
Corona Effect VIDEO: संत्र्यांच्या मागणीतील वाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यावर?
CORONA : विघ्नहर्त्यावर कोरोनाचे सावट; सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद