मुंबई - तब्बल 1 कोटी 80 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याने याचा परिणाम मुंबईत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येवर दिसून आला आहे. 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या काळात मुंबईत 3,360 गुन्हे घडले आहेत. यात 2,461 गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांनी लावत आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. 23 मार्च ते 29 मार्च या काळात तर मुंबईत केवळ 550 गुन्हे घडले आहेत.
हेही वाचा... 'कोरोना पसरवतो' म्हणून दिल्लीमध्ये एका तबलिगीची हत्या..
मार्च 2020 या महिन्यात मुंबईत 12 खून प्रकरणात गुन्हे नोंदवण्यात आले. त्यातील 10 प्रकरणांचा छडा पोलिसांनी लावला आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे 27 गुन्हे नोंदवण्यात आलेले, त्यातील 25 प्रकरणात आरोपींना पकडण्यात आले आहे. दरोड्याचे 55 गुन्हे घडले होते. त्यातील 47 प्रकरणांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे.
सोनसाखळी चोरीचे 14 , खंडणीच्या 13 गुन्हे, दिवसा घरफोडीचे 110 तर चोरीचे 301 गुन्हे मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. वाहन चोरीच्या 193 , जबर जखमी करण्याचे 324 तर दंगलीचे 42 व बलात्काराचे 73 गुन्हे मुंबई शहरात घडले आहेत. मुंबई शहरात मार्च 2020 या महिन्यात विनयभंगाचे 234 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.