मुंबई - 'कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला...' अशी घोषणा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला तसेच कार्यक्रमाला घुमत असे. बाळासाहेबांचा दराराच ही घोषणा सार्थ ठरवणारा होता. सध्या याचेचे स्मरण सध्याच्या कोरोना विषाणू आणि त्याच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने होत आहे.
हेही वाचा... महाराष्ट्र लॉकडाऊन..! कलम १४४ लागू, ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सोडून सर्व सेवा बंद
राजकीय किंवा सामाजिक प्रश्न असो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम ठरायचा. त्यांनी 'हो' म्हटले की 'हो' अन् 'नाही' म्हटले तर 'नाहीच'! त्यात अपवाद कधीही नसायचा. त्यामुळे एखाद्या प्रश्नावर कोणत्याही संघटनेने किंवा राजकीय पक्षाने बंद पुकारल्यानंतर सर्वांची नजर बाळासाहेबांच्या निर्णयाकडे (नव्हे आदेशाकडे) असायची. त्यांनी 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा दिला की, राज्यातील सर्वच व्यवहार ठप्प व्हायचे. रस्त्यांवर सामसूम असायची. त्यामुळे हा बंद हमखास १०० टक्के यशस्वीच व्हायचा.
आता त्यांचाच पुत्र उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवित आहेत. त्यांच्या हाती तर, सर्वच अधिकार आहेत. त्यांच्या कारकीर्दीतच करोना संसर्गासारखी भयावर स्थिती निर्माण झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे ठाकरे सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. राज्यात लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. आज तर जमावबंदीही जाहीर करण्यात आली आहे. तरीही रस्त्यावरची गर्दी कमी होत नसल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता शिवसेनाप्रमुख बाळासाहबे ठाकरे यांच्या पद्धतीनेच 'आदेश' दिले पाहिजेत. तरच रस्त्यावरची गर्दी कमी होईल आणि लोकांना या महामारीचे गांभीर्य कळेल, असे म्हटले जात आहे.
हेही वाचा... ..अन् मोदी संतापले! म्हणाले, नागरिक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाहीत