मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनाही कोरोनाची बाधा होत असून गेल्या 24 तासात मुंबई पोलीस खात्यातील 4 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबई पोलीस दलातील बोरिवली पोलीस ठाणे, दिंडोशी पोलीस ठाणे, वाकोला पोलीस ठाणे व संरक्षण विभागातील एक कर्मचारी अशा 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात पोलीस मृतांचा आकडा 40 वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही कोरोनाबधित 1,382 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 201 पोलीस अधिकारी तर 1,181 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 28 हजार 272 गुन्हे नोंदविण्यात आले असून मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 730 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 263 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 846 जणांना अटक करण्यात आली आहे. कोविड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 2 हजार 489 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1,333 प्रकरणात 25 हजार 862 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 81 हजार 528 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 7 कोटी 26 लाख 97 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 49 घटना घडल्या असून 86 पोलीस जखमी झाले आहेत.
मुंबई पोलीस खात्यात सर्वाधिक मृत्यू
लॉकडाऊन काळात रस्त्यावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई पोलीस खात्यातील 2,028 पोलीस कोरोना संक्रमित झाले असून यात 290 पोलीस अधिकारी तर 1738 पोलीस कर्मचारी आहेत. सध्या 795 पोलिसांवर उपचार सुरू असून यात एकूण 1233 पोलीस कोरोनातून बरे झाले असून दुर्दैवाने राज्यात मुंबई पोलीस दलातील 26 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला मुंबई पोलीस खात्यातील 516 पोलीस कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून तब्बल 224 पोलीस रुग्णालयात दाखल आहेत. 33 पोलिसांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.