मुंबई - सणासुदीचा काळ सुरू झाला असून, उद्या सर्वत्र दसऱ्याचा उत्साह असणार आहे. दसरा म्हटलं की फुलं-हार आणि तोरण आलीच. त्यामुळे दरवर्षी फुलांची-हारांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यंदा मात्र फुलविक्रीला कॊरोना आणि अतिवृष्टीचा असा दुहेरी फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे नुकसान झाल्याने विक्रीसाठी माल कमी उपलब्ध झाला आहे. तर दुसरीकडे कॊरोनामुळे ग्राहक मोठ्या संख्येने फुलखरेदीसाठी बाहेर पडताना दिसत नाही. त्यामुळे याचाही फटका फुल विक्रेत्यांना बसताना दिसत आहे. असे असले तरी दादरच्या फुल मार्केटमध्ये आज दुपारी बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळाली. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ही गर्दी खूपच कमी असल्याचे विक्रेते सांगताना दिसले.
दसऱ्याला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दसऱ्याच्या एक-दोन दिवस आधीच दादरच्या फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. पण यंदा मात्र फुलखरेदी विक्री मंदावली आहे. तर ग्राहकही मोठ्या संख्येने फूल खरेदीसाठी येताना दिसत नाही. दरवर्षी दादर फूल मार्केटमध्ये मुंबईच नव्हे तर मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) कानाकोपऱ्यातून ग्राहक येतात. यंदा मात्र अनेक जण दूर आणि गर्दीत जाण्याचे टाळत जवळपासच्या परिसरातून फूल खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. याचा परिणाम फूल विक्रीला बसल्याची माहिती दादर फूल मार्केटमधील एका फूलविक्रेत्याने सांगितले आहे.
झेंडूंच्या फुलांचे दर
एकीकडे कॊरोनाचा तर दुसरीकडे अतिवृष्टीचा फटका फूलविक्रीला बसला आहे. कारण झेंडू आणि इतर फुलाच्या शेतीचे मोठे नुकसान पावसाने केले आहे. तेव्हा जो काही माल वाचला आहे तोच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत कमी माल विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचेही विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. माल कमी झाल्याने झेंडूच्या फुलांचे भाव आज गगनाला भिडले आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी 60 रुपये किलोनी मिळणारी झेंडूची फुले काल बाजारात 80 रुपये दरात विकली. तर आज हाच दर थेट 150 ते 160 रुपये झाला आहे. त्यातही सुका झेंडू 200 रुपये किलो दराने विकला जात आहे.
दादर मार्केटमध्ये फुलांच्या किंमती वाढल्या -
उद्या दसऱ्याच्या दिवशी या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. किंमती वाढल्याने ग्राहक दरवर्षीपेक्षा कमी फुलेखरेदी करत असल्याचे चित्र दादर फूल मार्केटमध्ये पाहायला मिळाले. दरम्यान, आज दुपारी दादर फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी थोडी गर्दी दिसली. तर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडालेला दिसला. असे असले तरी उद्या कॊरोना सावटात मोठ्या उत्साहात दसरा साजरा होणार हे मात्र नक्की.