मुंबई - राज्यातील देवी-देवतांच्या यात्रा कोरोनाच्या संकटामुळे रद्द केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे पुढील महिन्यात भरणाऱ्या चैत्र महिन्यातील एकादशी यात्रेवरही कोरोनाचे संकट घोंगावणार असल्याने या प्रकरणी राज्य सरकारने योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
पंढरपुरातील चैत्र यात्रेला (एकादशी) राज्यभरातून सुमारे ४ ते ५ लाख वारकरी आणि भक्त येत असतात. त्यामुळे याच वेळेत नियोजन केले जावे, अशी मागणी परिचारक यांनी केली आहे.
हेही वाचा - COVID19 : 'पुण्यात आणखी एक रुग्ण, कोरोनासाठी खबरदारीचा नवा प्लॅन आखणार'
आरोग्यमंत्री राजेश टोपे आज दुपारी कोरोना संदर्भात निवेदन केले. त्यावेळी आमदार परिचारक यांनी पंढरपूरच्या यात्रेचा मुद्दा उपस्थित केला. परिचारक म्हणाले की, ४ एप्रिल रोजी चैत्र एकादशीची यात्रा आहे. या यात्रेला राज्यभरातून चार ते पाच लाख वारकरी येण्याची शक्यता आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीर पंढरपूरच्या चैत्र यात्रेचे सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने काय नियोजन केले आहे. त्याची माहिती सांगावी. तसेच चैत्र वारीविषयी सरकारने आपले नियोजन सांगावे. कारण वारकरी वारीच्या पूर्वीच दोन दिवस पंढरपुरात दाखल होत असतात.
पंढरपुरातील व्यापारी आपल्या दुकानात माल भरत असतात. यात्रेसंदर्भात सरकारने नियोजन सांगितल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान टळेल आणि वारकऱ्यांची गैरसोय दूर होईल, असेही परिचारक यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. सरकार सतर्क आहे. पंढरपूरच्या वारी संदर्भात लवरकरच माहिती देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच आरोग्य मंत्री टोपे यांनी पंढरपूरच्या वारीसंदर्भात सरकार योग्य ते नियोजन करेल, असेही स्पष्ट केले.