मुंबई महाराष्ट्रातील 126 तंत्रशिक्षण संस्था आहेत. या तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी तब्बल 12 कोटी 12 लाख 50 हजार 937 इतकी अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत केलेली नाही. अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत न दिल्यामुळे ही रक्कम महाविद्यालयांकडेच पडून आहे. विद्यार्थ्यांनी हि रक्कम परत मिळावी म्हणून मागणी देखील केली. मात्र, लाखो विद्यार्थ्यांची थकीत अनामत रक्कम विरोधी आमदार सत्तेत आल्यावरही परत का करू शकत नाही असा सवाल कॉप्स संघटनेकडून केला जातोय. ५ लाख विद्यार्थ्यांची 12 कोटी अनामत रक्कम महाविद्यालयांनी परत केली नाही.
सत्ता आहे तर समस्या सोडवा राज्यामध्ये हजारो शिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी घेतलेली अनामत रक्कम परत दिली नाही. मात्र ही अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत करणे क्रमप्राप्त होते. ही समस्या सोडवण्यासाठी त्यावेळी विरोधी पक्षात असताना विद्यार्थ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्याकडे निवेदनं देखील दिलीत. त्यांनी याबाबत आवाज उठवू असे देखील म्हटले होते. विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्न देखील उपस्थित केला गेला. आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन दोन महिने झालेले आहेत. मात्र, सत्ता हाती असूनही विद्यार्थ्यांची हक्काची रक्कम महाविद्यालयात पडून आहे. शासनाने काहीहि ठोस निर्णय घेतला नाही. ती अनामत रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित परत करावी ही मागणी लाखो विद्यार्थ्यांची आहे.
५ लाख विद्यार्थ्यांची 12 कोटी अनामत रक्कम याबाबत राज्याचे सहसंचालक तंत्रशिक्षण प्रमोद नाईक यांनी याच शैक्षणिक वर्षात विभागीय कार्यालयांना त्याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले होते. मात्र, अद्यापही सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांना त्यांची घेतलेली अनामत रक्कम त्यांना परत केली नाही. त्यामुळे तेव्हा विरोधी पक्षात होता.आता सत्तेत आहात तर विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे परत करा. असे कॉप्स संघटनेचे अध्यक्ष अमर एकड यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना सरकारकडे मागणी केली. तसेच डॉ अभय वाघ संचालक तंत्र शिक्षण यांनी ह्या बाबतीत १ सप्टेंबर रोजी विभागीय अधिकारी प्रमोद नाईक यांना तसे निर्देश दिले कि यावर त्वरित कार्यवाही करावी; अशी माहिती देखील कॉप्स संघटनेचे अमर एकड यांनी दिली .