मुंबई - १० डिसेंबर २०२१ रोजी होणारा मुंबई विद्यापीठाचा ( Annual Convocation of Mumbai University ) वार्षिक दीक्षांत समारंभ काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र आता विद्यापीठाकडून दीक्षांत समारंभाची २७ डिसेंबर ही ( 27 December ) नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यपालाच्या प्रमुख उपस्थितीत होणार दीक्षांत समारंभ
चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा दीक्षांत सोहळा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा आता २७ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. या दीक्षांत सोहळ्यात कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जहाँगीर हॉलमध्ये होणार दीक्षांत समारंभ
मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ मधील शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान करण्यासाठीचा दीक्षांत समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर हॉलमध्ये होणार आहे. यासंदर्भातील माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख, संचालक, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालय व्यवस्थापन तसेच मुंबई विद्यपीठाचे उपकेंद्र असलेल्या रत्नागिरी, ठाणे आणि कल्याणच्या समन्वयकांनाही परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.