मुंबई - काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने नेहमीप्रमाणे सुरुवातीच्या एक दोन दिवसांत गढूळ पाणी येणे साहजिक आहे. मात्र, मागील आठवड्यापासून भांडुप, कांजूर, मुलुंड आणि सभोवतालच्या परिसरात सातत्याने गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय.
सध्या साथीच्या रोगाने सर्वांना विळख्यात घेतले असून पालिकेने पुरवलेले पाणी पिण्यायोग्य देखील नसल्याने स्थानिकांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत साथीच्या रोगांचे प्रमाण वाढते. यंदा कोरोनाने मुंबईला घेरले आहे.
गढूळ पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र पालिका नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महापालिकेच्या एस विभागातर्फे सांगण्यात आले. लवकरच स्थिती पूर्ववत होणार असून तोपर्यंत रहिवाशांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मागील काही दिवसाेत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पुरवठा यंत्रणेत बिघाड झाला असून पालिकेचे कामगार-तंत्रज्ञ युद्धपातळीवर त्यासाठी काम करत आहेत. लवकरच नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल, असे एस विभागातील पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.