मुंबई - महापालिकेच्या शिक्षण समितीमधून काँग्रेसने संगीता हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता शिवसेनेचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. यामुळे आता शिवसेनेतर्फे यशवंत जाधव हे रिंगणात असून भाजपाचे मकरंद नार्वेकर निवडणूक लढवत आहेत. यंदा काँग्रेसकडून आसिफ झकेरीया यांना स्थायी समितीसाठी उमेदवारी मिळाली होती. तसेच शिक्षण समितीवर संगीता हंडोरे यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यांनी माघार घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेचे पारडे जड झाले आहे .
महापालिकेतील संख्याबळानुसार आता स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेने संध्या दोशी यांनी उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून सुरेखा पाटील यांनी तर, काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरला आहे. समितीत शिवसेना 11, भाजपा 10, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 1, समाजवादी पक्ष 1 असे सदस्य आहेत. वैधानिक समितीत स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती यांचा समावेश आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपाकडून स्थायी समितीसाठी मकरंद नार्वेकर तर, काँग्रेसकडून स्थायी समितीसाठी आसिफ झकेरीया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.