मुंबई - नगरपंचायत निवडणुकांमध्ये (Nagar Panchayat Election) काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकाच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने रणनीती आखली असून, या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळण्यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच काँग्रेसमधून अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Bhaiyyu Maharaj Suicide Case : भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात विनायक, चालक शरद आणि पलक दोषी; सर्वांना 6-6 वर्षाची शिक्षा
काँग्रेसने दिला होता "एकला चलो" चा नारा
नगर पंचायतीच्या निवडणुका होण्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने "एकला चलो चा नारा" दिला होता. अनेक ठिकाणी काँग्रेस महाविकास आघाडीमधून लढण्यात इच्छुक नव्हती. मात्र, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये एकला चलो" या भूमिकेचा फटका काँग्रेसला कोठेतरी बसल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांच्याकडून व्यक्त केले जातेय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सावधगिरीने पावले उचलताना दिसत असून होणाऱ्या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून विशेष रणनीती आखली जात असल्याचेही विश्लेषकांचे मत आहे. तसेच त्यांच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा ओघ देखील पाहायला मिळतोय. त्याचा फटका देखील होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता अजय वैद्य यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.
निवडणुकांसाठी तयार करणार रणनीती
महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता काँग्रेसने नवीन रणनीती आखली असून, "एकला चलो" चा नारा न देता काँग्रेस आता स्थानिक पातळीवर आघाड्यांसाठी चाचपणी सुरू केली आहे. प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली. काँग्रेसने निवडणुकांमध्ये एकटे न लढता स्थानिक राजकीय गणिताचा अभ्यास करून महाविकास आघाडीतील पक्षासोबत किंवा स्थानिक आघाड्यांना सोबत घेण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा झाली. निवडणुकांच्या सर्व जागांवर अशाप्रकारची चाचपणी केल्यानंतरच काँग्रेस आपली पुढील रणनीती आखणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तो फटका काँग्रेसला बसला, तो फटका स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बसू नये. यासाठी काँग्रेसकडून अशी चाचपणी सुरू करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये रस्सीखेच
नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा मात्र तेवढ्याच पटीने वाढल्या आहेत. काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात गेल्या असल्याचा अनेक ठिकाणी चित्र आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या 27 नगरसेवकांसह महापौरांनी देखिल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 27 जानेवारी रोजी प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या संपर्कात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी असून, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा इशारा नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. मात्र प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालेगावच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेश करताना केला. तसेच मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दर गुरुवारी राज्यभरातून इतर पक्षातून येणार्या लोकांच्या पक्ष प्रवेशाचा धडाका देखील सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला हा धक्का काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - महाआघाडी सरकार आतापर्यंत एकही केस कोर्टात जिंकले नाही, यापुढेही जिंकणार नाहीत - चंद्रकांत पाटील