मुंबई - महाराष्ट्राचे दैवत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात बदनामीकारक मजकूर आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण असल्याने मराठी अस्मितेला ठेच पोहचवण्याचे काम करण्यात आले आहे. राज्य सरकारने या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी, तसेच गिरीश कुबेर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल
छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही काही कथा, कांदबऱ्या तसेच पुस्तकातून केले जात आहे. आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात असाच बदनामी करण्याचा प्रकार केला आहे, यामुळे तमाम मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी आणि कुबेरांच्या ‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नाना पाटोले यांनी केली आहे.
पुस्तकावर बंदी घाला -
कुबेर यांनी याच पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशव्यांसोबत केली आहे. यातून कुबेरांना नेमके काय साध्य करायचे आहे? पुस्तकात वादग्रस्त, बदनामीकारक मजकुर छापून पुस्तकाची विक्री जास्त व्हावी हा लेखकाचा उद्देश असेल तर तो अत्यंत गंभीर आहे. याआधीही महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांबद्दल असेच आक्षेपार्ह व बदनामीकारक लिखाण करण्यात आले होते. अशा लिखाणातून दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दखल घेऊन सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा - अमरावतीत एकाच कुटुंबातील २ सख्ख्या भावांसह तिघांचा कोरोनाने मृत्यू