मुंबई - गेल्या पाच वर्षांपासून राज्यात बेरोजगारी, महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील भूमिका यंदाच्या बजेटमध्ये स्पष्ट करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. केंद्राच्या बजेटबाबत प्रसारमाध्यमांशी पटोले यांनी काल (सोमवारी) संवाद साधला.
- ...'म्हणून बिहारसारखी घटना पाहायला मिळाली'
केंद्रातील सरकारचे गेल्या दोन-तीन वर्षांत बजेट पाहिले आहे. देश विकून देश चालविण्याची भूमिकाच या बजेटमध्ये मिळत आहे. देशाच्या इतिहासामध्ये असे कधीही झाले नाही. देशाची रेल्वे सुद्धा त्यांनी विकली. हे विकणे आता बंद करा आणि देश खऱ्या अर्थानं या देशांमधल्या संशोधनाच्या आधारावर आर्थिक ताकद वाढून या देशाच्या लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला आता केंद्रातल्या भाजपा सरकारने सुरुवात करावी, अशी भूमिका पटोले यांनी मांडली. देश आता बेरोजगारांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. अशा या परिस्थितीमध्ये आश्वासन न देता यंदाच्या बजेटमध्ये बेरोजगारांना रोजगार कसे उपलब्ध करून दिला जाईल, हे स्पष्ट करावे. भाजपाने गेल्या 2014 पासून देशाच्या तरुणांना फक्त आश्वासन दिले. त्याव्यतिरिक्त काहीच दिले नाही. त्यामुळे बिहारमधील घटना सर्वाना पाहायला मिळाली, असे पटोले म्हणाले.
- 'शेतकरी आत्महत्या वाढल्या'
महागाई आभाळाच्या पार गेली आहे. सर्वसामान्य गरीब माणसाचे जगणे मुश्किल झाले. महागाई कशी कमी केली जाणार त्याच्याबद्दल विश्लेषण या बजेटमध्ये आले पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या गेल्या 2014 पासून देशांमध्ये सुरू झाल्या आहेत. केंद्राच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे. शेतकऱ्यांना बजेटमध्ये काय मिळणार ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
- 'केंद्रांची सरकार हृदय नसलेले'
दरवेळेस कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये निवडणुका येतातच. या पार्श्वभूमीवर बजेट सादर केले जातात. पण केंद्रांची सरकार हृदय नसलेले सरकार आहे. देशातील लोकांसाठी निर्णय घेण्याची क्षमता नसलेले सरकार केंद्रामध्ये आहे. तसेच मूठभर लोकांसाठी निर्णय घेणारे सरकार राहिले आहे. त्यामुळे देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी वाढत चालली आणि मूठभर लोक श्रीमंत होत आहेत. त्यामुळे या बजेटमध्ये सगळ्यांच्या अपेक्षा उलट आहेत. सर्वसामान्यांना न्याय मिळणार बजेट असावे, ही अपेक्षा आहे, अस पटोले म्हणाले. कोरोनाच्या निर्बंधाला कंटाळून कॅनडामध्ये देशाच्या प्रधानमंत्री विरोधात सगळा देश उभा झाला, तशी परिस्थिती आपल्या देशात येऊ नये. त्यामुळे हे बजेट लोकहिताचा असावे, ही अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Nashik : वाईनला विरोध करणार्यांच्या साखर कारखान्यात दारु तयार होते; भुजबळांचा विरोधकांना टोला