मुंबई - केंद्रीय नीती आयोगाने ( NITI Aayog Report ) देशाचा गरिबी अहवाल जाहीर केला. यामध्ये बिहारमधील ५१ टक्क्यांपेक्षा जास्त लोक गरीब असल्याचे म्हटले आहे. या यादीत महाराष्ट्राचा सतरावा क्रमांक लागतो. भाजपशासित राज्यांमध्ये अधिक गरिबी दिसून येत असल्याने भाजपने आता आत्मपरीक्षण करावे, असा टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ( Atul Londhe Criticize Bjp ) भाजपला लगावला.
केंद्रीय नीती आयोगाने ( NITI Aayog Report ) देशाचा गरिबी अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये बिहार सर्वात वरच्या स्थानी असून सुमारे ५२ टक्के जनता गरीब असल्याचे यात दिसून येते. त्या पाठोपाठ झारखंड ४२ टक्के, उत्तर प्रदेश ३७ टक्के, मध्य प्रदेश ३६ टक्के आणि मेघालय 32 टक्के ही राज्ये येतात. विशेष म्हणजे, पहिल्या पाच गरीब राज्यांमध्ये भाजपाशासित चार गरीब राज्यांचा समावेश आहे. राजस्थान आणि गुजरातसुद्धा या यादीत महाराष्ट्रापेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी गरिबी केरळ राज्यात दिसून येते. त्यापाठोपाठ गोवा, सिक्कीम, तामिळनाडू आणि पंजाबमध्येही प्रमाण कमी आहे. दरम्यान, महाराष्ट्राचा या यादीत सतरावा क्रमांक लागत असून महाराष्ट्रात १४.८५ टक्के लोकसंख्या गरीब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी, भाजपशासित राज्यांमध्ये अधिक गरिबी असल्याने भाजपने आत्मपरीक्षण करावे, असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.
भाजपचे असत्य आता लपणार नाही
भाजपचे टुलकिट पुन्हा पकडले गेले आहे. उत्तर प्रदेशातील विमानतळ सांगून बीजिंगमधील विमानतळ दाखवून दिले की असच होणार. दुसरीकडे स्वतःच्या अहवालामध्ये पहिल्या पाच गरीब राज्यांमध्ये भाजपशासित राज्ये आहेत. देशातील २८ राज्यांपैकी किती राज्यांत गरिबी अधिक आहे, हे भाजपने पहावे. महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेने खूप चांगल्या स्थितीत आहे. बिहार, गुजरातमध्येसुद्धा महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त गरीबी आहे. त्यामुळे, आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आपण खोटे बोलून विकासाच्या कितीही टुलकिट निर्माण केल्या तरी सत्य काही लपणार नाही. आहे त्यापेक्षा जास्त बेरोजगारी वाढली आहे. १४ करोडपेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत. लोकांना तुम्हाला जे पाच किलो धान्य द्यावे लागते ते तुम्ही बंद करणार होता, पण निवडणूक निकाल आल्यावर तुमचा निर्णय बदलतो. ही बंदी तुम्ही मार्चपर्यंत पुढे ढकलली. म्हणजे तुम्ही निवडणुकांसाठी केवळ असे निर्णय घेता, हे जनता आता ओळखून आहे, अशी प्रतिक्रिया अतुल लोढे यांनी दिली. दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
हेही वाचा - Yashomati Thakur Allegations : 'सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र'