मुंबई - पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राजकारणी, मंत्री, पत्रकार यांच्यावर पाळत ठेवण्याच्या वृत्तानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. पेगासस सॉफ्टवेअर निर्माण करणारी कंपनी 'एनएसओ' इस्त्रायल मधील असल्याने राज्यातील डीजीआयपीआर अधिकाऱ्यांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी डीजीआयपीआरचे अधिकारी इस्रायलला कोणत्या कामानिमित्त गेले होते? असे प्रश्न उपस्थित झाले होते. या अधिकाऱ्यांच्या बचावासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, हे अधिकारी शेतीविषयक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी इस्रायलला गेले असल्याचं सांगितले होते. मात्र हे अधिकारी शेतीविषयक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी इस्रायलला गेले नसून, इतर कारणांमुळे इस्रायलला गेले असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणत आहेत. तसेच या दौऱ्यात पाच अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं? या बद्दलचा अहवाल देखील अजून राज्य सरकारला सादर केला गेला नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी दौऱ्यात नेमकं काय केलं याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.
यासाठी होता इस्त्रायल दौरा
1 शासकीय जनसंपर्कातील नवे प्रवाह समजून घेणे.
2 सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर
3 वेब मीडियाचा जनसंवादासाठी वापर
4 डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर करुन शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय
5 आपत्कालिन स्थितीत किंवा एखाद्या मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांचा उपयोग
6 शासनाचे संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वसमावेशक माध्यम आराखडा
7 स्मार्ट सिटीमध्ये शासकीय जनसंपर्काची भूमिका
8 सायबर गुन्हे रोखण्यासाटी घ्यावयाच्या दक्षतेबाबत केलेली लोकजागृती
9 पर्यटनवृद्धीसाठी राबविलेल्या माध्यम उपक्रमांच्या यशकथांचा अभ्यास
10 ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या माध्यमांचा वापर
या कारणांसाठी डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांनी इस्रायल दौरा केला असल्याचं सांगण्यात येतंय. यात कुठेही लिहिलेले नाही की शेती आणि शेती तंत्रज्ञानासाठी हा दौरा आहे. शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी दौरा करुन आले मात्र या दौऱ्यामध्ये त्यांनी काय केले बाबतचा अहवाल अद्याप राज्य सरकारकडे गेला नसल्याने या दौऱ्याबाबत संशय व्यक्त केला जातोय. अधिकार्यांच्या इस्रायल दौऱ्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा दौरा शेती विषयी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठीच असल्याचं सांगितलं होतं. मात्र या दौऱ्याबाबत शंका असून दौऱ्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
आघाडी सरकार निर्मितीच्या काही दिवस आधी दौरा
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी दीड महिन्याचा वेळ लागला होता. यादरम्यानच डी जी आय पी आर चे अधिकारी इस्राईल दौऱ्याला गेले होते. त्यामुळे इस्राईल दौऱ्या करून पेगासेस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आघाडी सरकार मधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते का?अशी शंका आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळेच डी जी आय पी आर च्या अधिकाऱ्यांचा इस्राईल दौरा हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.