मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. या वक्त्याव्याविरोधात मुंबई महिला काँग्रेसच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदानाबाहेर काळी फित बांधून निदर्शने केली.
निदर्शने करणाऱ्या महिलांनी 'प्रज्ञा सिंह हाय हाय, बापू अमर रहे' अशी घोषणाबाजी केली. तसेच मुंबई महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या फोटोला काळे फासून चपलांचा हार घातला. त्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्या फोटोला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याला देशभक्त म्हणवणाऱ्या प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी यावेळी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव यांनी केली.
नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी वक्तव्य केल्यानंतर देशभरात त्यांचा निषेध करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील प्रज्ञा सिंह यांना माफ करणार नसल्याचे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.