मुंबई- देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहेत. हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात मलिक यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
चव्हाण यांचाही आरोप-
तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील 'केंद्राने केवळ लस देण्यात महाराष्ट्र सोबत दुजाभाव केला नसून, वैद्यकीय उपकरणे देण्यात देखील महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केल्याचा आरोप केला आहे. ट्विट करून त्यांनी यासंबंधी खंत व्यक्त केली आहे. लोकसभेत मिळालेल्या आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत केंद्राने या राज्यांना अधिकचे पीपीई किट, N95 मास्क आणि व्हेंटिलेटर दिले असल्याचे आपल्या ट्विटच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्रसरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे. यावर महाविकास आघडीतील मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत केंद्र सरकार महाराष्ट्राबरोबर दुजाभाव करत असल्याचा आरोप केला.