मुंबई - केंद्र सरकारकडून खेळाडूंना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार ठेवण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर काँग्रेस नेत्यांकडून टीका केली जात आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राचा नेता होण्यासाठी राज यांनी व्यापक भूमिका घ्यावी; भेटीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
केवळ नाव बदलण्याचं राजकारण केंद्र सरकार करत आहे - नाना पटोले
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देशातील खेळाडूंना सर्वोच्च मानाचा पुरस्कार दिला जात होता. राजीव गांधी यांचे देशासाठी असलेले योगदान हे सर्वश्रुत आहे. तरी केवळ नाव बदलण्याचं राजकारण केंद्र सरकार करत आहे. केंद्रात असलेल्या भाजप सरकारकडून कोणत्याही नव्या योजना आणल्या जात नाहीत, केवळ काँग्रेसच्या योजनांचे लेबल बदलण्याचं काम मोदी सरकार करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपकडे स्वतःचे कर्तुत्व नाही - अस्लम शेख
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडे स्वतःचे कर्तुत्व नाही, त्यामुळे केवळ नाव बदलण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, अशी टीका अस्लम शेख यांनी केली आहे.
मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल नितांत आदर - काँग्रेस
मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केंद्र सरकार एखादा नवा पुरस्कार सुरू करू शकत होतं. मात्र, सरकारकडून तसे झालं नाही. त्यांनी खेलरत्न पुरस्करातलं राजीव गांधी यांचे नाव काढून त्या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांचे नाव जोडलं आहे. यातून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये काँग्रेस विषयी असलेला आकस स्पष्टपणे दिसून येतो, अशी भावना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार खेलरत्न पुरस्कार; मोदींची घोषणा