मुंबई - राज्यात आमचे सरकार स्थिर असून, सरकारला कोणताही धोका नाही. उलट भाजपचे लोक आमच्या संपर्कात असून, ते लोक कोण आहेत, हे कळले तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत महिला व बालकल्याण विकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले. राजस्थाननंतर राज्यातील सरकारही अस्थिर होईल का, यासंदर्भात त्यांना प्रश्न उपस्थित केला असता, त्यांनी हे भाकीत केले.
विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज जे लोक आहेत ते सर्व बाहेरून आलेले आहेत. ते मूळ भाजपचे लोक नाहीत. त्यामध्ये अनेक लोक आमचे आहेत. त्यामुळे ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात. इतकेच नाही तर भाजपचे अनेक लोकही आमच्या संपर्कात असून, हे कोण आहेत याची माहिती कळाली, तर एक राजकीय भूकंप होऊ शकतो असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'सेनेपुढे लोटांगण घालण्यापेक्षा त्याविरोधात लढा, अन्यथा पक्ष संपेल'
भाजपला केंद्रात मोठे बहुमत आहे. ही सत्ता मिळाल्यानंतर विविध राज्यांमध्ये सुद्धा सत्ता मिळावी म्हणून त्यांना हाव सुटली आहे. एखाद्या शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणात राहतो अशी त्यांचीही हाव असल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. आमच्या महाविकास आघाडीचा फार्मूला खूप चांगला सुरू आहे. जर कुणी हे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. आमच्यातील कोणीही फुटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.