मुंबई - मुख्यमंत्री ठाकरे हे वांद्रे कलानगरमध्येच मातोश्री-2 या निवासस्थानाचे बांधकाम करत आहेत. ज्या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे, त्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे. ज्या व्यक्तीकडून ठाकरे यांनी ही जमीन घेतली, त्या व्यक्तीची सक्तवसुली संचालनालयाकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे या जमिनीचा व्यवहार ही जनतेसमोर आला पाहिजे, अशी मागणी ही निरुपम यांनी केली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.
निरुपम यांनी म्हटले की, कलानगर येथील मातोश्री दोनच्या बांधकामासाठी ठाकरे यांनी 2016 साली इंस्टोलिंग बायोटेक कंपनीचे संचालक राजभूषण दीक्षित यांच्याकडून 5.80 कोटी रुपयांना जमीन विकत घेतली. पण व्यवहारात घोळ असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. वांद्रे येथील मोक्याच्या जागेवर इतक्या कमी किमतीत ही जमीन मिळणे शक्य नाही. जमिनीची किंमत कमी करून सांगण्यात आली आहे. तसेच ज्या दीक्षित यांच्याकडून ही जमीन विकत घेण्यात आली. त्या दीक्षित यांच्यावर मनी लॉडरिंग प्रकरणी सीबीआयने आरोपत्र दाखल केले आहे.
हेही वाचा - एक नारद, शिवसेना गारद; देवेंद्र फडणवीसांचा 'बाण'
दीक्षित यांच्या कंपनीवर जवळ जवळ 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असून सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालय याची चौकशी करत आहे. दीक्षित यांच्यासारख्या आरोपीकडून ठाकरे यांनी जमिनीचा व्यवहार केला असल्याने या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून या व्यवहारात रोख रक्कम किती आणि धनादेशाने किती व्यवहार झाले आहेत, याचीही माहिती जनतेला मिळायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली. दरम्यान निरुपम यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला नंतर अद्याप शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
कसे आहे मातोश्री - 2 चे बांधकाम...
दिवंगत शिवसेनाप्रमुख यांनी वांद्रे कलानगर येथे सत्तरच्या दशकात बांधलेल्या "मातोश्री" या निवासस्थानाच्या समोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2016 साली 'मातोश्री-दोन' चे बांधकाम सुरू केले. ही इमारत 8 मजल्यांची असून दहा हजार स्क्वेअर मीटरमध्ये याचे बांधकाम आहे. यात 3 ड्युप्लेक्स फ्लॅट असणार आहेत. तसेच 5 बेडरूम असणार आहेत. या निवासस्थानात, मिटिंग हॉल, जिम आणि स्विमिंग पूल देखील असणार आहे. सध्या ही इमारत बांधून तयार आहे, मात्र अजून ठाकरे कुटुंबाने या निवासस्थानात गृह प्रवेश केलेला नाही.