मुंबई - देशाला स्वातत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान राहिलेले आहे. काँगेसच्या नेतृत्वाखालीच देश घडला, परंतु ज्यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणतेही योगदान नाही, ते लोक आज देश विकत आहेत. त्यामुळे आज देशाला वाचवण्यासाठी काँग्रेस पुन्हा मैदानात उतरत आहे. त्यासाठीचे हे आंदोलन आम्ही देशव्यापी सुरू केले असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी आज मुंबईत दिली.
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी शेतकरी मोर्चावरुन 'आप'च्या धनंजय शिंदेंवर केला गुन्हा दाखल
काँग्रेसकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले असून त्याची सुरूवात मंगळवारी झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी ही आंदोलने केली जाणार आहेत. तर, महाराष्ट्रातही प्रत्येक ठिकाणी हा विरोध केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - 'शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा राहिलेलो नाही'
मोहन प्रकाश म्हणाले, की आज देशातील बँकिंग व्यवस्था मोदी सरकारने उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी पाच वेळा अध्यादेश जारी केला होता. त्याला आमचे नेते राहुल गांधी आणि आम्ही विरोध केल्याने तो अध्यादेश लागू होऊ शकला नाही. यामुळे देशातील शेतकरी हा आपल्या शेतीचा मालक राहिला. देशात उत्पादन, निर्यात क्षेत्रात मोठी घट होत असून ती सुरूच आहे. ४५ वर्षांत सर्वांत जास्त बेरोजगारी वाढलेली असताना त्यावर कोणी बोलत नाही. त्यावर कोणता पर्यायही शोधला जात नाही. आजच इन्फोसिससारख्या कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय जाहीर केला.
आज देशात सार्वजनिक क्षेत्रातील २६ कंपन्या आहेत, त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेऊन नफ्यात असलेल्या १० कंपन्याचे खासगीकरण करायचे ठरवले असून त्यानंतर इतर कंपन्या विकून टाकण्याचे ठरवले आहे. जेव्हा की, यातील एकही कंपनी या लोकांनी बनवली नाही. हे लोक केवळ देश विकायला काढले असल्याने आम्हाला आता देश वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचेही ते म्हणाले.
परतीचा पाऊस आणि त्यामुळे जे नुकसान होत आहे, ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये नुकसान होत आहे. अशा वेळी विमा कंपन्या काय करत आहेत? यातही ज्या सरकारी विमा कंपन्या आहेत, त्यांना लाभ होऊ दिला जात नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या लोकांच्या ज्या विमा कंपन्या आहेत, त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. देशात ज्या महत्वाच्या दहा खासगी विमा कंपन्या आहेत, त्यात सात विमा कंपन्या या मोदीजींच्या जवळच्या लोकांच्या आहेत. त्या कंपन्या शेतकऱ्यांना पैसे का देत नाहीत? असा सवाल करत मोहन प्रकाश यांनी या सरकारने १ लाख ६७ हजार कोटी रुपये उद्योगपतींना दिले. मात्र, ते शेतकऱ्यांना देत नसल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी केला.