मुंबई - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि आमदार भाजपत प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. आज मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे उघड केले नसले तरी येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुनर्वसन संदर्भात चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार प्रसाद लाड यांच्याकडून मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई काँग्रेस पूर्णपणे बुडत असल्याचे पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी बुडणाऱ्या बोटी बाहेर उड्या मारून स्वतःचे राजकीय पुर्नवसन करण्याकडे पाऊल उचलले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी शिवसेना आणि भाजपा युतीला ४१ जागा मिळाल्या. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला ४ आणि पुरस्कृत १, अशा ५ जागांवर समाधान मानावे लागले. आता या निकालाचा परिणाम विधानसभेवरही होईल अशीही चर्चा रंगली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.