मुंबई - 2019 च्या निवडणुकीत मुदत संपल्यानंतरही शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांचा प्रचार सुरूच होता असा आरोप करत काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब आणि शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
केले 'हे' आरोप -
मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आरोप केले आहेत की, माझ्याविरोधात विधानसभा निवडणुकीत अपप्रचार केला. इतकेच नव्हे तर प्रचाराची मुदत संपून गेली असताना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत प्रचार केला. या याचिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होते की काय? अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
काय आहे प्रकरण -
2019 मध्ये मो. आरीफ नसीम खान यांनी काँग्रेसच्या तिकीटावर चांदीवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांचा विजय झाला होता. अगदी अटीतटीच्या लढतीमध्ये लांडेंनी खान यांचा 409 मतांनी पराभव केला होता. या निवडणूक प्रचारात प्रचाराची मुदत संपल्यानंतर देखील प्रचार सुरुच होता असा दावा याचिकेत केला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण