मुंबई - मुंबई बँक प्रकरणात ( Mumbai Bank Case ) अगोदरच अडचणीत सापडलेले भाजप नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या प्रकरणी दरेकर यांच्यावर फसवणुकीचे नवीन आरोप केले आहेत. केवळ प्रवीण दरेकरच नव्हे तर त्यांच्या पत्नीसह त्यांच्या कुटुंबातील अनेक जण बोगस मजूर म्हणून कार्यरत आहेत. दरेकर गॅंग ज्या मजूर संस्थांचे सदस्य आहेत, त्या मजूर संस्थांचीही सहकार विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
काय म्हणाले भाई जगताप ? - बोगस मजूर म्हणून आणि मुंबई बँकेत केलेल्या दोन हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा विचार करता प्रवीण दरेकर यांना ताबडतोब अटक करून पोलीस कोठडीत त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. आता मुंबई बँकेत बोगस मजूर दाखवल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. पण, प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष म्हणून दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सहकार विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. तसेच त्यांनी मुंबई बँकेच्या प्रतिज्ञापत्रात मजूर असल्याचे प्रतिज्ञापत्र आणि आमदार म्हणून आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी उद्योजक व्यावसायिक नमूद करून कोट्यवधींची मालमत्ता दाखवलेली आहे. तसेच ते व त्यांची पत्नी व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन प्रतिज्ञापत्रे दाखवणे हा देखील एक मोठा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यांतर्गतही प्रवीण दरेकर यांच्यावर ताबडतोब कारवाई होणे गरजेचे आहे. एकाच वेळी मुंबई बँकेचा मजूर आणि विधानसभेत स्वतःला आमदार म्हणून व्यावसायिक दाखवणारा प्रवीण दरेकर हे 'श्री ४२०' असून त्यांची जागा ही तुरुंगातच आहे. त्यामुळे दरेकर यांनी अटक करून त्यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, त्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आपण करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Congress Leader Bhai Jagtap ) यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
मजुरांच्या मजुरीत घोळ - भाई जगताप पुढे म्हणाले, प्रतिज्ञा मजूर संस्थेत प्रवीण दरेकर यांच्या समवेत एकूण २७ मजूर सदस्य आहेत. मात्र, सहकार विभागाकडून या २७ मजुरांनी मजुरी केल्याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. मात्र, मागील १० वर्षांत या मजूर संस्थेला कोट्यवधी रुपयांची कामे मिळाली. मग ही कामे नेमकी कोणत्या मजुरांनी केली व कोणत्या मजुरांना मजुरी मिळाली ? या मजूर संस्थेचे बॅंक स्टेटमेंट तपासले असता वेळोवेळी संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी वेळोवेळी रोखीने पैसे काढल्याचे दिसून येते. तसेच १५ मजुरांची खाती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत काढण्यात आली असली तरीही या मजुरांच्या खात्यात मजुरी जमा झालेली दिसत नाहीत. तर हजेरी पत्रानुसार रोखीने ती त्यांना दिल्याचे दिसून येते. प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या अहवालामध्ये मागील १० वर्षांमध्ये मजूर म्हणून सदस्य असलेल्या प्रवीण दरेकर यांनी मजुरीचे काम केले किंवा नाही ते स्पष्ट होत नाही.
भाजपची स्थिती दयनीय - माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याची भाषा करणारे प्रवीण दरेकर यांनी आधी स्वतःची अब्रू काय आहे ते त्यांनी पाहून घ्यावे. एकाचवेळी मजूर, आमदार, उद्योजक दाखवणारा हा श्री ४२० आहे व त्याची जागा तुरुंगातच आहे. प्रतिज्ञा मजूर संस्थेत प्रवीण दरेकर हा "मजूर रंगारी" असल्याचे दाखवून त्याने भाजपला सुद्धा चुना लावलेला आहे. मूळ भाजपवाल्यांची परिस्थिती या बोगस मजुरांमुळे दयनीय झालेली आहे, असे भाई जगताप म्हणाले.
हेही वाचा - Appointment of Dange : परमवीर सिंग विरोधात तक्रार करणाऱ्या डांगेंच्या नियुक्ती मुळे पुन्हा चर्चा