मुंबई - राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने इमरान प्रतापगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हाय कमांडने शेवटच्या क्षणी उमेदवारी लादल्याने राज्यातील अनेक काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. काही काँग्रेस नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे, तर काहीजण खाजगीत नाराजी व्यक्त करत असले तरी पक्षश्रेष्ठींच्या विरोधात जाहीरपणे बोलायला तयार नाहीत. इम्रान प्रतापगडी हे योग्य उमेदवार असल्याचे ते सांगत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही नाईलाज झाल्याने त्यांनीही प्रतापगडी यांची पाठराखण केली आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आक्रमक नेते आशिष देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्ष राज्यात चौथ्या नंबर वर असतानाही काँग्रेसचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत.
देशमुख यांनी दिला पदाचा राजीनामा - राज्यातील कोणत्याही तरुण नेतृत्वाला वाव देण्याऐवजी राज्याबाहेरून उमेदवार आयात करण्याची गरज काय होती. असा सवाल करीत आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली, आपल्या पदाचाही राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेने आणि नेत्यांनी कधीपर्यंत बाहेरून लादलेल्या उमेदवारांसाठी काम करत राहायचे, असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
चिंतन शिबिरात कवाली शिकवा - पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून जर आपल्या मर्जीतीलच नेत्यांना उमेदवारी मिळणार असेल. कवाली आणि शायरी हेच जर यासाठी पात्रता ठरणार असेल. तर चिंतन शिबिरांमध्ये सुद्धा आता कार्यकर्त्यांना कव्वाली आणि शायरी शिकवा, असा टोलाही देशमुख यांनी लगावला आहे. काँग्रेस पक्ष टिकावा वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा - picture of osama bin laden : वीज कार्यालयात ओसामा बिन लादेनचा लावला फोटो, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - धक्कादायक : गरीब कल्याण संमेलनात महिलेवर रेशन कार्ड दाखवून जेवण मागण्याची नामुष्की, महिलेचे डोळे पाणावले
अठरा वर्षांची तपश्चर्या कमी - नगमा : सिने अभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या नगमा यांनीही या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहून सातत्याने काम करीत असतानाही आपल्याला डावलले गेले. गेल्या अठरा वर्षांची आपली तपश्चर्या फळाला आली नाही, त्या ऐवजी इमरान प्रतापगडी यांना मात्र उमेदवारी मिळाली, अशी नाराजी नगमा यांनी ट्विट च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
वासनिकांना राजस्थानमध्ये उमेदवारी - महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते असलेल्या मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक इम्रान प्रतापगडी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्याचा विचार पक्षातून सुरू होता. राजस्थानच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला तीव्र विरोध केल्यानंतर प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली, अशी माहिती काँग्रेसमध्ये सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत इम्रान प्रतापगढी? - इमरान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील बेल्हा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे पूर्ण नाव मोहम्मद इब्रान खान असा आहे. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी हिंदी भाषेतून एमए केला आहे. तर पत्रकारितेचाही डिप्लोमा केला आहे. लहानपणापासून ते कव्वाली आणि शायरी यांचे कार्यक्रम करतात. शायर म्हणून त्यांची ख्याती आहे. यासाठी त्यांनी प्रतापगढी असे नाव धारण केले आहे.
केव्हा झाली राजकारणात एन्ट्री? - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदार संघातून प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांना काँग्रेसचे तिकीट दिले जाणार होते. मात्र त्यांचे तिकीट कापून राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करून प्रतापगडींना तिकीट दिले. मात्र या लोकसभा मतदारसंघात प्रतापगडींचा दारुण पराभव झाला.
राहुल गांधींची भेट आणि प्रतापगडी एकदम खास - 2018 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी आणि प्रतापगडी यांची भेट झाली. सुमारे अर्ध्या तासाची ही भेट प्रतापगडीसाठी खास ठरली. या अर्ध्या तासाच्या भेटीत झालेल्या चर्चेनंतर प्रतापगडी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते राहुल यांचे निकटवर्तीय झाले. राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या प्रतापगडी यांना राहुल गांधी यांनी
अखिल भारतीय अल्पसंख्याक काँग्रेस सेलचे अध्यक्ष पदाची जबाबदारी ही सोपवली.
प्रियंका यांच्या आग्रहाने उमेदवारी - इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर उमेदवारी देण्यासाठी प्रियंका गांधी ही आग्रही होत्या. प्रियकांच्या शिफारशीनुसारच इमरान गडी यांची उमेदवारी निश्चित झाली, अशी माहिती काँग्रेस मधील सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - Threats To Deepali Sayyad : 'मला जीवे मारण्याची धमकी, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करणार' - दीपाली सय्यद
हेही वाचा - नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ई़डीचे समन्स