मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीवर काँग्रेसकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या गर्दीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे चौकशी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
गर्दी झालीच कशी याची चौकशी व्हायला हवी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं या घटनेवर लक्ष आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले. महाविकास आघाडीतील मंत्रीच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असतील, तर जनतेसमोर काय संदेश जाईल? म्हणून मुख्यमंत्र्यांनी लवकर यासंदर्भात पावले उचलण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच प्रतिबंधात्मक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीचे आवाहन सामान्य जनतेला केले आहे. तसेच राजकीय नेते मंडळींनीही आपल्या सभा, बैठका काही दिवस घेऊ नये असेही आवाहन केले. त्यामुळे मंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेल्यावर एवढी मोठी गर्दी नेमकी कशी झाली याची चौकशी होणे गरजेचं असल्याचं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आपण कुणालाही मंदिर परिसरात बोलाविले नसून नागरिक स्वतःहून तिथे आल्याचं स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिलं आहे.
शरद पवार-मुख्यमंत्री भेटीत चर्चा?
पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोड यांनी बंजारा समाजातील हजारो समर्थकांना एकत्र करून नियमांचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रतिमेला धक्का बसल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत नाराजीही व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री स्वतः नागरिकांना नियमांच्या पालनाचं आवाहन करीत असताना मंत्रीच जर प्रतिसाद देत नसतील तर जनतेत वेगळा संदेश जाईल. तसेच विरोधकही राज्य सरकारला धारेवर धरत असल्याची चर्चा या भेटीत झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
बदनामी न करण्याचे राठोड यांचे आवाहन
वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे येऊन दर्शन घेतले. यावेळी या ठिकाणी मोठा जनसमुदाय गोळा झाला होता. यावेळी बोलताना पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणात घाणेरडे राजकारण झाल्याचा आरोप संजय राठोड यांनी केला होता. माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करू नका असेही राठोड यावेळी म्हणाले होते.