मुंबई - केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, यासाठी शेतकरी संघटनांनी आज देशभर भारत बंदची हाक दिली आहे. शेतकरी संघटनेच्या या हाकेला काँग्रेसकडूनही पाठिंबा देण्यात आला आहे. आज राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मुंबईतही काँग्रेसकडून अशाप्रकारचे उपोषण करण्यात आले. मंत्रालय परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसकडून उपोषण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मंत्री अमित देशमुख, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या चार महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारने केलेले कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. यासाठी अनेक वेळा शेतकरी नेत्यांसोबत केंद्र सरकारच्या नेतेमंडळींनी बैठका घेतल्या. मात्र, त्या बैठकांतून काही निष्पन्न झालेले नाही. केंद्र सरकारला कृषी कायदे रद्द करायचे नाहीयेत, केवळ शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळायचे आहे असा थेट आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. तर तिथेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला असून, केंद्राने केलेले कृषी कायदे संसदेत चर्चेविना पास करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, जर हे कृषी कायदे रद्द झाले नाही तर येणाऱ्या काळात काँग्रेस रस्त्यावर उतरून हे आंदोलन अजून तीव्र करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - 5 एप्रिलपर्यंत थकित 'एफआरपी' न दिल्यास कारखानदारांना धडा शिकविणार - राजू शेट्टी