मुंबई - गेली दोन महिने आपल्या पगारापासून वंचित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने मागील काळात बेस्ट उपक्रमासाठी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून थकलेले सुमारे ७१ कोटी रुपये तातडीने बेस्टने एसटीला वर्ग करावेत, अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली आहे.
वेतनासाठी अधिकाऱ्यांची पायपीट -
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला ७ तारखेला होते पण ऑगस्ट महिना संपला तरी जुलै महिन्याचे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचे वेतन देखील सप्टेंबरच्या ७ तारखेला मिळण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ५०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मात्र रक्कम एसटीच्या खात्यात वर्ग झाले नाही. तत्पुर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचे बेस्टकडून ७१ कोटी रुपये येणे बाकी आहेत. ते पैसे देखील गेली ६ महिने पाठपुरावा करून देखील मिळाले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अधिकाऱ्यांना पायपीट करावी लागत आहे.
हे ही वाचा - मुंबईतील भुजबळांचे घर कोणाचे हे मुख्यमंत्री व शरद पवारांनी सांगावे, किरीट सोमैय्यांचे आव्हान
वेतनासाठी ६०० कोटींचा खर्च -
कोरोना महामारीत गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सार्वाजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. अशात कोट्यवधींचे उत्पन्न अचानक बंद झाल्याने महामंडळ आर्थिक संकटात सापडले. गेल्या दीड वर्षात बहुतांश वेळा वेतनास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांकडून मनस्ताप व्यक्त होत आहे. एसटीच्या ९७ हजार कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन झाले नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला २९० कोटींची आवश्यकता असते. आज अखेर जुलै महिन्याचे वेतन मिळाले नाही. तसेच ऑगस्ट महिनाही संपला असून ७ सप्टेंबरला ऑगस्ट महिन्याचे आणखी एक वेतन द्यावे लागणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला एकूण ५५०-६०० कोटींची आवश्यकता आहे. राज्य सरकारने केवळ ५०० कोटी मंजूर केले आहेत. मात्र ते अद्याप एसटीच्या खात्यात वर्ग झाले नाही. त्यासाठी अधिकारी मंत्रालयात चकरा मारत आहेत.
हे ही वाचा - देशात सप्टेंबरमध्ये सरासरीहून अधिक पाऊस होईल- भारतीय हवामान विभागाचा अंदाज
रवी राजा यांना दिले पाठपुराव्यासाठी पत्र -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यापार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी इ. लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली होती. या शिवाय सर्व सामान्य नागरिकांच्या वाहतुकीची सुद्धा जबाबदारी एसटीने यशस्वीपणे पार पाडली.
कोरोना काळात बेस्टच्या मदतीला धावलेल्या लालपरीचे १९९ पैकी ७१ कोटींचे येणे बाकी आहे. मात्र राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन खात्याकडून ती रक्कम आल्यानंतर आम्ही देऊ असे बेस्ट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी मे पासून पायपीट करूनही हे ७१ कोटी मिळाले नाहीत. त्यामुळे यामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी पुढाकार घेतला असून बेस्टकडून एसटी महामंडळाला मिळणारी ७१ कोटी रक्कम तात्काळ मिळण्यासाठी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांना या प्रकरणी पाठपुरावा करावा, असे आज मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पत्र देऊन सांगितले आहे.