मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस उरले आहेत. सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजय निरुपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांनी बांद्रा जिल्हाधिकारी इथे अर्ज भरला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर १०० मीटरच्या आतच मोदी चोर है, काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण या मतदारसंघात येत्या २९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ९ एप्रिल आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले संजय निरुपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर. भाजपचे गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्वच तिन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले केले. संजय निरुपम (उत्तर पश्चिम), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रिया दत्त यांच्याबरोबर नामांकन अर्ज भरण्यासाठी अभिनेता संजय दत्त ही उपस्थित असल्यामुळे कार्यकर्त्यांनी संजू बाबाला बघण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे पोलिसांची काही काळासाठी तारांबळ उडाली.उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेसमध्ये येण्याने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच जोश निर्माण झाला आहे. उर्मिलाने नामांकन अर्ज भरल्यानंतर बाहेर येऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. निरूमप यांनीही बाहेर येऊन कार्यकर्त्यांचे आभार आणि राहुल गांधींचा जयजयकार केला.