मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (शुक्रवारी) काँग्रेसकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता असतानाच आज राज्यभरात विविध विभागांत 5 निवडणूक प्रमुखाची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यासाठी मराठवाडा, विदर्भ, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या विभागासाठी प्रमुख जबाबदारी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा - काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?
मुकूल वासनिक यांच्यावर संपूर्ण विदर्भ विभाग तर अविनाश पांडे यांच्यावर मुंबई विभागासह निवडणूक प्रक्रियेसाठी काँग्रेसकडून राबवण्यात येत असलेल्या निवडणूक नियंत्रण विभागाची ही प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील यांच्यावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आर.सी. कुंटीया यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
मराठवाड्यासाठी काँग्रेसचे गुजरात प्रभारी आणि वरिष्ठ नेते राजीव सातव त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसकडून आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी हे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.